Thursday, April 11, 2019

व्यवसाय आणि मनोवृत्ती


व्यवसाय आणि मनोवृत्ती
धनंजय वसंत मेहेंदळे, पुणे

आज एका बऱ्यापैकी प्रसिद्ध अशा प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात गेलो होतो.बाहेर उन्हात खूप फिरूनही  त्या संस्थेचं प्रकाशन असलेलं एक पुस्तक कुठे मिळत नव्हतं, म्हणून त्यांच्या कार्यालयाचा पत्ता मिळवून ते गाठलं. कार्यालयात दोनच कर्मचारी होते. तसे निवांतच. हवं ते पुस्तक मिळालं. पैसे दिले. 
तिथे आणखी काही पुस्तकं मांडलेली होती. वाचनाची बऱ्यापैकी आवड असल्याने पावलं आपोआपच तिकडे वळली. पुस्तकं विकत घेण्याच्या दृष्टीने बघू लागलो. दोन पुस्तकं घेतली, तेवढ्यात एक कर्मचारी आला.
म्हणाला, "साहेब आता लंचटाईम झालाय, नंतर या." 
म्हटलं, "ही पुस्तकं घ्यायची आहेत." 
तर तो म्हणे, "नंतर या." 
मी आधी शोधत होतो, ते पुस्तक चांगलं महाग होतं. आणि ही दोन पुस्तकं सुद्धा किरकोळ नव्हती.
'ठिक आहे' म्हणून मी तिथून निघालो. दाराबाहेर काढलेल्या चपला घालत असतांनाच, तो कर्मचारी आला आणि धाडकन दार लावून घेतलं. 

याआधी घडलेला असाच एक प्रसंग...
कामं आटपून रात्री 10 वाजता घरी येत असतांना, घराजवळच्या एका स्टेशनरीच्या दुकानात गेलो. 
'दुकान उघडं होतं.' दुकानदार आत कॉम्प्युटरवर काहीतरी करत होता. काय हवंय, ते त्याला सांगितलं. तर तो अनुनासिक स्वरात उर्मटपणे म्हणाला, "दुकान बंद झालंय." 
मी, "ऑ, दुकान तर उघडं दिसतंय मला, म्हणून आलो."
दुकानदार, "नाही नाही, व्यवहाराची वेळ संपली. उद्या या." (मनातल्या मनात) त्याला शिव्या घालत तिथून निघालो. म्हटलं अवघड आहे.

पण या उलट एका राजस्थानी माणसाच्या दुकानात वेगळा अनुभव आला.
उन्हाळा असल्याने, रात्री आइस्क्रीम घेण्यासाठी त्या दुकानात गेलो.
दुकानाला कुलूप लावून तो निघत होता. मी तिथे गेलो, तर त्याने अदबीनं 'काही हवंय का' विचारलं. 
म्हटलं, "फक्त आइस्क्रीम हवं होतं; पण राहू दे. बंद केलंय ना दुकान."
तर तो म्हणे, "एवढंच ना, देतो की." असं म्हणत, माझ्या पुढच्या बोलण्याची वाट न पाहता, दुकान पुन्हा उघडायला लागला. मोठ्या साखळीने कुलूप लावलेलं दुकान उघडलं. डीप फ्रीजचं कुलूप उघडून मला म्हणाला, "या, हवं ते घ्या."
त्याला त्या 'कडेकोट बंदोबस्तातील' दुकान उघडायला लावल्याने मला थोडं awkward वाटलं आणि त्याचं कौतुकही...
त्याला धन्यवाद दिले. म्हटलं, "माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला."
दुकानदार, "कुलूप उघडण्याचा कसला त्रास, उलट माझा धंदा झाला. मला चार पैसे जास्त मिळाल्याचं समाधान आणि तुम्हाला हवं ते मिळाल्याचं समाधान..."

आधीचे दोन अनुभव आणि हा अनुभव. दोघेही व्यावसायिक; परंतु मनोवृत्ती भिन्न...

6 comments:

 1. म्हणूनच म्हणतात की मराठी माणसाला धंदा करता येत नाही...

  ReplyDelete
 2. इथेच तर महाराष्ट्रीयन माणूस मागे पडतो. मग परप्रांतीयांना दोष देतात. वेगळ्या भाषेत सांगायचं तर "आपलंच नाणं खोटं, वाण्याला दोष का द्यायचा?"

  ReplyDelete
 3. या कारणामुळेच मराठी माणूस धंद्यात मागे पडतो. आमची कुठेही शाखा नाही हे सांगणं आम्हाला भूषणास्पद वाटतं. कटु आहे तरी सत्य आहे. काय करणार?

  ReplyDelete
 4. निर्मला कुलकर्णीThursday, April 11, 2019 5:15:00 AM

  खरंय. असा अनुभव अनेकदा येतो. दुकानसरकारी असेल तर नक्कीच.

  ReplyDelete
 5. मुंबईत अस अनुभवाला कमी येतं.पण ही मनोवृत्ती पुण्यातच जास्त दिसते..

  ReplyDelete