Wednesday, May 18, 2011

डोक्याला 'शॉट' देणारी माणसं

डोक्याला 'शॉट' देणारी माणसं
प्रसंग : पहिला.

वेळ : सकाळची, साधारणपणे १० - १०.३० ची. कामाची गडबड सुरू असते. दिवसभराचं शेड्यूल लावणं, महत्वाची कामं दुपारच्या आत आटोपण्याची गडबड. तेवढ्यात मोबाईलची घंटी वाजते. नंबर अनोळखी असतो. गडबडीत फोन उचलतो.
"हॅलो !"
"धनंजय का?"
"हो. आपण ?"
"ओळख पाहू, कोण बोलतंय ते..."
"माफ करा, नाही ओळखलं. कोण आपण ?"
"काय राव, आता आमचा आवाजपण विसरलास का?" (आता इथे माझ्या डोक्याची घंटी वाजते.)
मी थोडा वैतागतो. पण सकाळची वेळ असल्याने मी ३ इडियट्स मधल्या अमीर खान सारखं 'आल इज वेल' म्हणत स्वतःला शांत ठेवतो. पण पलीकडच्या व्यक्तीने घंटा वाजवण्याचं काम सुरूच ठेवलं होतं.
"हो बरोबर आहे, आता काय बाबा तुम्ही मोठी माणसं झालात. बिझी माणसं. आता आम्हाला थोडंच लक्षात ठेवणार?"
"बरं, झाली चूक माझी. आता तरी सांगाल, आपण कोण ते ?"
"बास का, आता आपली जुनी दोस्तीपण विसरलास का? एवढ्या वर्षांत भेटलो नाही, तर आवाज विसरलास, मग मला काय लक्षात ठेवणार तू ?" वगैरे वगैरे भुंगा सुरूच.
या फोनमुळे माझी कामाची लिंक तुटली, मूड गेला... पार माकड झालं माझं. मनात म्हटलं, आता सगळं काम disturb झालंच आहे, तर बघुयाच आता, कोण आहे ते. आता आपण याचं माकड करू. मग मीही या खेळासाठी तयार झालो. फोनवर त्या माणसाची वटवट सुरूच होती.
"..... दोस्त दोस्त ना रहा..." वगैरे... वगैरे...
"अहो, अहो, असे नाराज होऊ नका... ओळखलंय मी केव्हांच, तुम्ही कोण आहात ते."
पलीकडचा माणूस जरा आनंदाने "सांग बरं कोण ते..."
"अमिताभ बच्चन"
"काय चेष्टा करतोय गरिबाची."
"काय ? अमिताभ, तू गरीब कधी झालास ?"
"अरे, तो नाही रे, मी गरीब."
आता वैतागायची पाळी त्या माणसाची.
"म्हणजे तू अमिताभ नाहीस ? मग कोण ?"
"अरे मी सचिन."
"काय ??? साक्षात सचिन तेंडुलकर ?????"
"अरे नाही यार, सचिन जोशी....."
आता पलिकडून पूर्ण वैतागलेला आवाज.
"अरे, असं पूर्ण नाव सांग की. नुसतं सचिन सांगायला जगात तू काय एकटाच सचिन आहेस का ? आडनांव सांगायला लाज वाटते का ? तुमचं खानदान नाव न घेण्याइतकं........"
"बास्स... बास्स... माफ कर बाबा. चूक केली मी तुला फोन करून." त्याचा रडकुंडीला आलेला आवाज....
"अरे माणसाने................." आता मी त्याला प्रवचन देऊन रडवायला सुरू केलं होतं.
पलीकडून प्रतिसादाची अपेक्षा.......
पण.......
".........." पलीकडून फक्त शांतता.
"हा.. हा... हा...."

प्रसंग : दुसरा
या अशा निनावी फोनवाल्या माणसांप्रमाणेच आणखी काही लोक आहेत, डोक्याला शॉट देणारे... ते म्हणजे टी.व्ही.प्रेमी.....
सध्या टी.व्ही.वर अनेक सिरिअल्स असतात. 'फालतू' असं मी म्हणणार नाही. कारण 'फालतू' म्हटलं तर, लोकांच्या भावना दुखावल्या जातील. हल्ली कोणाच्या भावना कधी दुखावल्या जातील, काही सांगता येत नाही. पण आजकाल सगळेच भयंकर टी.व्ही.च्या आहारी गेलेत. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत.
लहान मुलं बघाल, तर डोळ्याची पापणी न हलवता तासनतास टी.व्ही. जवळ बसून पोगो, कार्टून नेटवर्क बघत असतात. मग मोठ्या माणसांचं विचारायलाच नको. खऱ्या माणसांपेक्षा टी.व्ही.तली माणसं अधिक प्रिय असतात. त्यांना कोणाशी फोनवर बोलताना ऐकलं तर वाटेल, घरातल्या कोणाबद्दल तरी बोलतायत. पण ते बोलणं सिरिअल मधल्या पात्रांविषयी असतं. म्हणजे बघा......
"अगं, काल त्या सिमरनचं काय झालं गं ?"
"अगं, ती काल घरातून रागारागाने बाहेर पडली. जोरात गाडी चालवत गेली. आज बघ तू तिचा Accident होतो की नाही ते..."
ऐकणारा गार पडलेला असतो/असते. पण हे बोलणं असतं टी.व्ही. सिरिअलमधल्या पात्रांबद्दल.
तर अशा या टी.व्ही.प्रेमी मंडळींच्या घरी संध्याकाळी ७ ते १० या वेळेत जाण्याचा मूर्खपणा अजिबात करू नये. कारण आपण गेलो की, वर वर उसनं हासू आणून स्वागत करतात.
पण मनात.... "कशाला आला आत्ताच माझ्या सिरिअलमध्ये ? धड बघता सुद्धा येणार नाही माझी सिरिअल." असं काहीतरी मनात चरफडण असतं. आणि एक सिरिअल संपली की दुसरी, मग तिसरी, चौथी.... संपतच नाहीत. आपलं माकड झालेलं असतं. आपल्याला त्या सिरिअल्सचे अत्याचार सहन करण्याशिवाय पर्याय नसतो.
माझा एक मित्र त्याच्या सासूबाईंकडे अजिबात त्या वेळेत जात नाही. कारण सासूबाईंना जावई आणि मुलीपेक्षाही सिरिअल्स महत्त्वाच्या असतात. एकदा सोफ्यावर त्या बसल्या की, जेवण वगैरे टी.व्ही. समोरच. मित्राचे सासरे ताट वाढून आपल्या बायकोला आणून देतात. जेवल्यावर त्या ताटातच हात धुणार. मग सासरे त्यांना सोफ्यावरच औषधं देणार. रोज रात्री १० वाजेपर्यंत हे चालतं. त्यानंतर मग सासूबाईंना बाकीच्या माणसांची आठवण होते.
मध्यंतरी मी माझ्या लग्नाचं आमंत्रण करायला अशाच एका टी.व्ही. प्रेमी घरी गेलो. माझं घडयाळाकडे लक्ष नव्हतं. त्या काकूंनी थोड्या नाखुशीनेच स्वागत केलं. म्हटलं काय झालं काकूंना ? आणि आत गेल्यावर बघतो तर काय... त्यांचा Prime Time सुरू होता. सिरीअलचा काहीतरी महत्वाचा Segment चालू होता. आणि तो चालू असतांना काकूंना दार उघडायला उठावं लागलं होतं.
आता सिरीअलचा ब्रेक होईपर्यंत मला थांबवं लागणार होतं. ब्रेक झाला, मग पाणी मिळालं.
"आज कसा काय आलास ?"
"माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला आलो."
"हो का ? अरे वा ! छान छान !"
वगैरे, वगैरे बोलणं सुरू होतं. आणि तेवढ्यात ब्रेक संपला. सिरिअल पुन्हा चालू.
"थांब आता पुढचा ब्रेक होईस्तोवर."
"अहो काकू, मला पुढे अजून आमंत्रणं करायची आहेत."
"थांब रे, १० मिनिटांनी काही होत नाही. आता पुढचा ब्रेक होईपर्यंत मध्ये बोलू नकोस."
मी गप्प.....
ब्रेक झाला. वेळ साधून पटकन आमंत्रण केलं. काकूंनी पत्रिका पाहिली. तारीख, वार, मुहूर्त पाहिले.
"अरे वा ! मंगळवारी सकाळी १०.४५ चा मुहूर्त आहे का ? मग मला येत येईल."
"बिझी आहात का तेव्हा ?"
"अरे नाही रे, मंगळवारी सकाळी १० वाजता त्या अमुकतमुक सिरीअलचा रिपीट एपिसोड असतो नां... मी कध्धीच तो चुकवत नाही... १०.३० ला तो संपला, म्हणजे मग मला येता येईल ! नंतर मी मोकळीकच आहे. बरं केलंस हो, पावणे अकराचा मुहूर्त ठेवलास ते."
आता मी काय बोलणार ? मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. आणि अशा माणसांकडे पुन्हा जातेवेळी '७ ते १०' वेळा विचार करूनच जायचं, असा निश्चय केला. दुसरं काय.......

4 comments:

  1. आई शप्पथ! संपूर्ण पोस्टशी सहमत!!

    ReplyDelete
  2. अगदी अगदी! आजकाल घरातल्या माणसांपेक्षा सिरियलमधील माणसेच जिव्हाळ्याची झालीत... :(

    ReplyDelete