Thursday, January 27, 2011

काहिशी अपरीचित; परंतु अप्रतिम म्युझियम्स

काहिशी अपरीचित; परंतु अप्रतिम म्युझियम्स

मध्यंतरी मला दोन छान म्युझियम्स पाहण्याचा योग आला. काहिशी वेगळी पण अप्रतिम... एक म्हणजे लोणावळ्याजवळील सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम आणि दुसरं म्हणजे हैदराबादमधील सुधा कार्स म्युझियम.... ही दोन्ही म्युझियम्स आवर्जून बघण्यासारखी आहेत.

सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम, लोणावळा :हे म्युझियम म्हणजे लंडनच्या मॅडम तुस्सॉं म्युझियमची भारतीय कॉपी आहे. ज्यांना ते म्युझियम पाहायला जाणं शक्य नाही, त्यांनी भारतातलं हे म्युझियम नक्की पाहावं. हे म्युझियम नवीनच बांधलेलं आहे... केरळचे तरूण कलाकार श्री. सुनिल कंडल्लूर यांनी येथील मेणाचे पुतळे तयार केले आहेत... आतमध्ये गेल्यावर श्री. बालाजी तांबे यांचा सुबक पुतळा दिसतो. तो इतका हुबेहुब आहे की, समोर प्रत्यक्ष बालाजी तांबेच उभे आहेत की काय असे वाटते. हा पुतळा पाहिल्यावरच या कलाकाराची कला आपल्याला पुढे आणखी त्यांची कारागिरी पाहण्यासाठी खेचून नेते. प्रत्येक पुतळ्याच्या डोळ्यांमधले भाव जिवंत वाटतात. या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, राजीव गांधी, यांच्याबरोबरच हा कलाकार केरळमधील असल्यामुळे तेथील नेते, अभिनेते, संत यांचेही पुतळे आहेत. बालाजी तांबे यांच्याप्रमाणेच एम.एस. सुब्बलक्ष्मी, महात्मा गांधी, ऑस्कर विजेते ए.आर. रेहमान, रसूल पोक्कुटी, हरीहरन, मायकल जॅक्सन यांचेही पुतळे अप्रतिम.
ज्यांनी लंडनचं म्युझियम पाहिलंय त्यांना याबाबत विशेष वाटणार नाही. पण एका भारतीयाने निर्माण केलेलं हे म्युझियम पाहायलाच हवं. येथे |font title="Click to correct" class="transl_class" id="739">जितके
भारतीय व्यक्तिंचे पुतळे पाहायला मिळतील, तेवढे लंडनला नाही मिळणार हे नक्कीच...
आता त्याच्या म्युझियममध्ये लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्यासह अनेक दिग्गजांचे पुतळे लवकरच पाहायला मिळतील. त्या पुतळ्यांच्या निर्मितीचं काम सध्या केरळात सुरु आहे.
आमच्या सुदैवाने आम्ही तिथे गेलो तेव्हा श्री
. सुनिल कंडल्लूर आलेले होते. त्यांच्याशी आमची भेट झाली. एवढा चांगला कलाकार; पण अतिशय सधा, विनम्र माणूस...
एक विनंती : जर आपण लंडनच्या मॅडम तुस्सॉं म्युझियमची तुलना या म्युझियमशी करणार असाल, तर जाऊ नका... एका भारतीयाची कला पाहण्यासाठी एक रसिक म्हणून जा...
कसं पोहोचाल ? :
जुन्या मुंबई- पुणे हायवेवरून लोणावळ्याहून पुण्याकडे येताना लोणावळ्यापासून साधारणपणे ५-६ किलोमीटरवर वरसोली गावात उजव्या हाताला हायवेला लागूनच सुनिल्स सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम आहे. आपल्याला वाटेत ठिकठिकाणी म्युझियमकडे जाण्याचा मार्ग दाखविणा-या पाट्या दिसतीलच.
अधिक माहिती : www.celebritywaxmuseum.com या वेबसाईटवर मिळेल.

सुधा कार्स म्युझियम, हैदराबाद :


हैदराबादला गेलो की, आपण सर्वसाधारणपणे काय पाहतो ? चार मिनार, गोवळकोंडा, सालारजंग, हुसेन सागर, रामोजी सिटी.... वगैरे.... वगैरे....
यामध्ये आणखी एका ठिकाण अवश्य पाहा... ते म्हणजे के. सुधाकर यांचं सुधा कार्स म्युझियम. हे काही जुन्या गाड्यांचं म्युझियम नाही. इथे आहेत एका कलाकाराच्या कल्पकतेतून अवतरलेल्या वेगवेगळ्या भन्नाट आकारातल्या गाड्या...
आत गेल्यावर, रस्त्यावरूनच आपल्याला दर्शन होतं एका महाकाय सायकलीचं. के. सुधाकर नावाच्या या अवलियाने १ जुलै २००५ मध्ये जगातली सर्वात मोठी तीन चाकी सायकल तयार करून हैदराबादच्या रस्त्यावरुन चालवली... त्याच्या या विक्रमाची नोंद गिनिज बुकमध्ये आणि लिम्का बुकमध्ये झाली आहे. ४१ फ़ूट उंचीच्या य़ा सायकलच्या चाकांचा व्यास आहे १७ फ़ूट.
जेव्हा आपण आत जातो, तेव्हा आपला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अनेक वेगवेगळ्या आकाराच्या कार्स समोर दिसतात. कॅमेरा, सूटकेस, कपबशी, वांगं, बर्गर, फ़ूटबॉल, कॉम्प्युटर, स्नूकर टेबल, बेड, शिवलिंग, पक्ष्याचा पिंजरा, अशा वेगवेगळ्या आकारातल्या कार्स आपल्याला वेडं करतात... जगातली सर्वात छोटी डबलडेकर बस, फ़ाऊंटन पेनच्या आकारातली बाईक, जगातली सर्वात छोटी बाईक असे अफ़लातून प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. या प्रत्येक वाहनात त्याच्या साईजप्रमाणे १ ते ४ माणसे बसू शकतात. वर्षातून एकदा या सर्व कार्स, बाईक्स रस्त्यावर चालवल्या जातात. याच बरोबर रेल्वेचे वेगवेगळे मॉडेल्स, सर्वात लांब सायकल, अनेक माणसे चालवू शकतील अशी सायकल हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतं.
एक काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान आपल्याला मिळतं.
तेव्हा हैदराबादला गेलात की, बाकीच्या स्थळांप्रमाणे हे अवश्य पाहाच...
कसं पोहोचाल ? : सुधा कार्स म्युझियम
१९-५-१५/१/डी, बहादूरपुरा, झूऑलॉजिकल पार्कजवळ, हैदराबाद.
अधिक माहिती : www.sudhacars.net या वेबसाईटवर मिळेल.

1 comment:

  1. हे उत्तम केलंस. अशीच अपरिचित ठिकाणांची माहिती देत जा रे.

    सॉरी रे नेहमी वेळ मिळत नाही ब्लॉग वाचायला. ईमेलने कळवलंस ते बरं केलंस.

    ReplyDelete