Sunday, October 24, 2010

काही इच्छा... अपूर्ण आणि पूर्ण !!!

काही इच्छा... अपूर्ण आणि पूर्ण !!!


माणसाच्या अनेक इच्छा असतात. कधी त्या पूर्ण होतात; तर कधी अपूर्णच राहतात... जर पूर्ण झाल्या तर काही Problemच नसतो. पण जर त्या अर्धवटच राहिल्या तर मात्र असं म्हणतात की, असा माणूस मेल्यानंतर तो भूत बनून मानगुटीवर बसून त्या पूर्ण करून घेतो. तसं होऊ नये म्हणून दहावं, श्राद्ध या वेळी कावळ्याला "काव... काव..." करून अगत्याने बोलावतात... पिंडाला शिवायला... मग तो कावळारूपी आत्मा जरा भाव खायला लागतो. मग घरातले एक एक जण येऊन त्याला हात जोडतात आणि म्हणतात, मी अमूक करीन, मी तमूक करीन पण एकदाचा शीव रे बाबा... आमच्या पोटात इथे कावळे ओरडतायत... अर्थात हे त्यांचं "पोटातल्या पोटात" बोलणं असतं... असो.

हे सगळं लिहिणं यासाठी कारण, माझ्याही काही अपूर्ण इच्छा आहेत... म्हणजे मी काही मरत बिरत नाही आणि अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी भूतही बनून येणार नाही.... कारण माझ्या ज्या इच्छा आहेत, त्या कधी पूर्णच होणा-या नाहीत आणि कोणीही पूर्ण करू शकणार नाही... वेगळ्याच आहेत त्या...

काही अशा आहेत की, त्या नशिबातच नव्हत्या... त्यातली एक इच्छा म्हणजे पु.लं.ची भेट... पुलंना लहानपणापासून वाचत-ऐकत आलोय.... पुस्तकं, कॅसेटमधून... प्रत्यक्ष भेटणं मात्रं खरंच राहून गेलं... हा साहित्य पंढरीचा विठोबा नाही भेटला; पण रखमाई मात्र भेटली... सुनिताबाईंना मी भेटलो तेव्हा तसं म्हटलंदेखील... त्यवेळी त्यांनाही भरून आलं...

पुलं प्रमाणे त्यांचे मित्र वसंतराव देशपांडे... पण मला कळायला लागलं तेव्हा वसंतराव जाऊन खूप काळ लोटला होता... त्यांच्या रूपात सध्या राहूल देशपांडे आल्याने वसंतरावच गातायत असं वाटतं...

गदिमा - वसंतरावांप्रमाणे यांनाही भेटणं तर अशक्यच... माझा जन्मही नसेल झालेला...
गदिमा काय, वसंतराव काय, या थोर व्यक्ति आधिच होऊन गेल्यात.... पण पुलंसारख्या व्यक्ति हयात होत्या तेव्हा त्यांना न भेटणं हे दुर्भाग्यच म्हणावं लागेल.

आणखी अपूर्ण इच्छा... निळूभाऊ फुले... सिनेमात खलनायक, पण ख-या आयुष्यात देवमाणूस... त्यांना भेटता आलं नाही; पण जवळून पाहता आलं... मित्राच्या Computer Institute च्या उदघाटनाला ते आलेले तेव्हा... पण भेटता न आल्याची खंत राहिलीच...

विजय तेंडूलकर... धाडसी लेखक... लोकांच्या कर्मठ विचारसरणीला धक्का देणारं लेखन करणारा... अगदी शेवटच्या क्षणी ते ज्या प्रयाग हॉस्पिटलमधे होते, त्या समोरचा रस्ता माझ्या येण्या-जाण्याचा... पण ते गेल्यानंतर कळलं की, ते तिथे अ‍ॅडमिट होते...

बरेच लोक यावर मला म्हणतात की, आता ते नाहीत, पण त्यांच्या साहित्य, कलेने ते आपल्या जवळच आहेत वगैरे वगैरे... ठिक आहे... पण मी म्हणेन त्यांचं साहित्य, कला हे अमरच आहे. Technologyमुळे आपल्याला ते पुन्हा पुन्हा भेटतात मान्य आहे; पण त्यांचा सहवास लाभणं हे तर किती सौभाग्याचं आहे... साधं उदाहरण : बाबुजी - सुधीर फडके जेव्हा सावरकर चित्रपटाच्या एका शो ला आलेले तेव्हा भाषणं झाल्यावर ते निघाले, मी सही मागितली, त्यांचा हात थरथरत होता... त्यांनी पाठीवर थरथरता हात ठेवला... भरून पावलो... सहीपेक्षा मोठं समाधान... मिळालं. त्यांना आधार देत मॅनेजरच्या केबिनमध्ये सोड्लं... काय हवं आणि ? त्यांचं गीत रामायण प्रत्यक्ष त्यांना गाताना पाहिलं-ऐकलं, तेव्हा मी लहान होतो खूप. पण आत्ता जेव्हा कळतं तेव्हा आठवलं की धन्य वाटतं.

हे झालं गेलेल्या व्यक्तिंबद्दल. आता असलेल्या व्यक्तिंबद्दल... आजही आपण पुस्तकं वाचतो, C.D., V.C.D. वरून गाणी ऐकतो, पण त्या कलाकाराला प्रत्यक्ष अनुभवणं यात वेगळीच मजा असते... त्यांना अनुभवणं म्हणजे फक्तं प्रत्यक्ष पाहणं, ऐकणं नव्हे; तर त्यांच्याशी बोलणं, समजून घेणं तितकच महत्वाचं.

आता बाबासाहेब पुरंदरेंची पुस्तकं वाचणं, त्यांचं व्याख्यान कॅसेट, सी.डी. वर ऐकणं आणि प्रत्यक्ष समोर बसून बाबासाहेबांना शिवचरित्रं सांगताना पाहणं म्हणजे हा एक चमत्कारच आहे. आणि हे ज्यांनी अनुभवलंय, अनुभवतायत, त्यांनाच कळेल... (पण आजकाल असा सुवर्णानुभव घ्यायच्याऐवजी काही गुडघी अकलेची मंडळी ज्यांनी कधीही याचा अनुभव घेतला नसेल किंवा घेतला असल्यास त्यांची ते समजण्याची बौद्धीक कुवत नाही, त्यांना हे कधीच कळणार नाही. ते केवळ स्वत:च्या सवंग प्रसिद्धीसाठी जातीचं राजकारण करत बसलेत. शिवाजी महाराजांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, ते ही मंडळी करत बसली आहेत... असो राजकारण माझा विषय नाही)

बाबासाहेब पुरंदरे महान इतिहासकार, पण केव्हाही गेलो तरी स्वत: हसतमुखाने स्वागत करणार... आपुलकीने बोलणार... लहान मुलांशी देखील लाडाने बोलतानाही त्यांना बाळराजे म्हणून आहो-जाहो करणार...

लता मंगेशकर, आशा भोसले यांना कार्यक्रमात भेटलो, पण एवढी मोठी अंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या या महान गायिका; पण बोलण्यातही आवाजाप्रमाणे मार्दव. माझ्यासारख्या लहानांशी बोलतानासुद्धा नम्रता, आपुलकी असते....

भारताचा महान फलंदाज कपिल देव - मी बिर्ला कंपनीत होतो तेव्हा तो बिर्लाचा ब्रॅंड अ‍ॅंबेसेडर होता... त्याच्या बरोबर आम्हाला दुपारचं जेवण घ्यायची संधी मिळाली... एवढा मोठा माणूस, पण आमच्याशी बोलताना अतिशय साधा. कुठेही घमेंड नाही... हसतमुख, प्रसन्न... आमच्याही फिरक्या घेत हसत खेळत आमच्याबरोबर वावरला...

मी पु.लं., निळूभाऊ यांच्याबद्दल लिहितांना त्या माझ्या अपूर्ण इच्छा असं म्हटलं, किंवा आताचे बाबासाहेब, दीदी वगैरे यांच्या संदर्भातले दाखले दिले, कारण हेच की, या सर्व महान व्यक्ती आहेत... पण त्यांच्या सहवासातूनच त्यांच्यातला खरा माणूस दिसतो...

3 comments:

 1. wow
  Dhananjay Uttamach ahe bare, he barech lokanchya manat aste pan tu express keles tehi changlya reetine,nice of you
  keep it up

  ReplyDelete
 2. बाबासाहेब पुरंदरे आणि पु.ल. यांना मी प्रत्यक्ष भेटलोय :)
  त्यामुळे तुझ्या इच्छा मी समजू शकतो.

  ReplyDelete
 3. तुला आश्चर्य वाटेल, पण मी इयत्ता चवथीत असतांना एक कोळी नृत्याचा शो केला होता... आणि त्यात आमच्या ग्रूपला प्रथम पारितोषिक मिळाले होते...आणि सगळ्यांच्या साठी आश्चर्याजनक गोष्ट म्हणजे, बक्षीस समारांभाला चक्क नीळु फुले आले होते! आजही माझ्याकडे ते माझ्या ग्ळ्यात गोल्ड मेडल घालतानचा फोटो आहे... मी दाखवेंन कधी ज़ळ्गाव ला जओन आणता आला फोटो तर...

  Swapnil

  ReplyDelete