Friday, July 23, 2010

‘गुगलवरचे शहाणे’

‘गुगलवरचे शहाणे’
पूर्वी आपल्याकडे एक म्हण होती... अजूनही आहेच- ‘उंटावरचे शहाणे’...
तशी आज एक म्हण मला नव्यानेच कळली- ‘गुगलवरचे शहाणे’...
आपल्या आसपास हे ‘गुगलवरचे शहाणे’ खूप दिसतात... बरेचजणांना त्यांचा अनुभवही येतो...
ही ‘शहाणे’ मंडळी सगळीकडे वावरताना आपणच ‘जगात भारी’ अशाच (गैर) समजुतीत असतात... समोरचा एखाद्या विषयातला Master असेल, तर हे ‘गुगलवरचे शहाणे’ त्याच्यापेक्षा आपणच किती हुशार आहोत असे समजतात...
ही मंडळी काय करतात, तर ऑफिसमध्ये बसल्या बसल्या इंटरनेटवर गुगलमध्ये जाऊन काही ना काही Search करत बसतात... आणि त्या Search केलेल्या अर्ध्या हळकुंडाच्या तुकड्यावर पिवळेधम्मक होतात(तसं झाल्याचं त्यांना वाटतं)... इतके पिवळे की ‘कलर गया तो पैसा वापस...’
"बस्स... आता मीच यातला Master आहे... अरे, बघच ! त्याला कसा माझ्या नॉलेजवर आडवा पाडतो ते."
आपण केवढे Master झालोय त्यात, असं वाटायला लागतं... मग काय, हे असे लोक ‘मोकाट’ सुटतात... म्हणजे जातील तिथे ‘मीच शहाणा, मीच शहाणा’ या थाटात वावरायला लागतात आणि निष्कारण वाद घालायला लागतात.
अरे कशाला...??? काय गरज आहे...??? त्या क्षेत्रात तू master आहेस की तो आहे? तुला जास्त कळतं त्यातलं का त्याला...???
गुगल किंवा इतर कोणत्याही वेबसाईटवरून माहिती घ्या; पण आपल्याला माहित असावं यासाठी घ्या... सगळेच वापरतात ते माहिती घेण्यासाठी... पण त्याचा वापर करून समोरच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करू नका...
जर का असं नुसतं इंटरनेटवरून एखाद्या क्षेत्रात माहिर होता येत असतं, तर सगळे डॉक्टर, वकिल, इंजिनीअर आणि अनेक, हे घरी बसूनच इंटरनेटवरूनच पास झाले असते... पण नाही, आम्ही नुसते शहाणे नाहीत, तर ‘अती शहाणे’ आहोत हे ते अभिमानाने सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात.
आणि या अतिशहाण्यांचा समाजाला काडीमात्र उपयोग न होता उपद्रव मात्र होत असतो.
एक मजेशीर किस्सा आहे घडलेला...
एका डॉक्टरांच्या ओ.पी.डी.मध्ये एक जोडपं येतं... दोघेही उच्चशिक्षीत असतात... दोघंही आय.टी.मध्येच असतात. ती बाई प्रेग्नंट असते... ते डॉक्टरांना आपला प्रॉब्लेम सांगतात... डॉक्टर तो ऐकून घेतात... त्या बाईला काही त्रास होत असतो. डॉक्टर त्यावर त्यांना काय उपाय करायला हवेत ते समजावून सांगायला लागतात... औषधं कोणती घ्यावीत, कोणती घेऊ नयेत वगैरे... त्यावेळी या जोडप्यामधला ‘डॉ. गुगले’ जागा होतो... डॉक्टर माहिती सांगत असताना हे दोघं त्यांनाच उलटं शिकवायला जातात... की, डॉक्टर, यावर उपाय मी गुगलवर वाचलेला आहे... अमुक अमुक केलं की तमुक तमुक होतं, मी गुगलवर वाचलेलं आहे.... याच्यावर ही गोळी चांगली आहे, मी गुगलवर वाचलेलं आहे... याच्यासाठी हे करायला हवं, मी गुगलवर वाचलेलं आहे...
डॉक्टर वैतागतात... म्हणतात, "डॉक्टर मी आहे की तुम्ही आहात ? एवढं सगळं तुम्हाला गुगलवरून समजतं, तर मग तुमच्या बायकोची डिलिव्हरी गुगलवरच करा."
त्या जोडप्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता.
तर असे हे ‘गुगलवरचे शहाणे’. मी फक्तं हे एक उदाहराण दिलं... असे अनेक किस्से आहेत...
हे लोक जिथे जातील तिथे आपली अक्कल पाजळतील... आणि उपद्रव निर्माण करतील... किंवा स्वत:चं हसू करून घेतील...
असो... तर अशा अतिशहाण्यांना कोण समजविणार ?

3 comments:

  1. अगदी मनापासून पटलं रे.

    ReplyDelete
  2. १००% सहमत. ’निम हकीम खतरायें जान ’तशातलीच गत आहे ही. कुरघोडी करत राहण्याच्या स्वभावामुळे काही जण स्वत:चा व दुसर्‍याचा वेळ घालवत राहतात.

    ReplyDelete