Tuesday, July 6, 2010

मराठी अभिमान गीत आणि कौशल इनामदार
नमस्कार,

आज मी एका कलाकाराच्या कलाकृतीवर लिहीतोय...

"लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी" ही सुरेश भटांची रचना... मराठी अभिमान गीत

हे मराठी अभिमान गीत ज्याने संगीतबद्ध केलं त्या कौशल इनामदारबद्दल...

खूप उशिरा लिहितोय... कारण वेगळं आहे... शेवटी येईलच ते...

संगीतकार कौशल इनामदार... मराठीमधील आघाडीचा युवा संगीतकार...

आज ते ओळखले जातात ते मुख्यत्वे करून या मराठी अभिमान गीतामुळे...

त्याच्या या गीताचं कौतुक खुद्द अमिताभ बच्चन यांनी केलं... त्यांनी हे गीत इंटरनेट्वर पहिल्यांदा ऐकलं आणि ते सुद्धा भारावून गेले....

हे गाणं एकट्याचं नाहीए... तर सगळ्या मराठी माणसांचं आहे...

म्हणूनच की काय, त्यांनी हे गीत कोण्या एकट्या गायक किंवा गायिकेकडून गाऊन घेतलं नाही... तर ११२ प्रख्यात गायक, ज्यात ८ वर्षाच्या मुग्धा वैशंपायनपासून ८० वर्षांच्या विठ्ठ्ल उमपांपर्यंत सर्वांचा समावेश आहे... आरती अंकलीकर- टिकेकर, देवकी पंडीत, सुरेश वाडकर, अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, स्वानंद किरकीरे... आणि अशा अनेक दिग्गजांनी या गाण्याच्या एक - एक ओळी गायल्या आहेत... आणि त्यांच्या सोबत आहे ३५६ जणांचा कोरस...

एक मोठ्ठं आणि यशस्वी टीमवर्क कशाला म्हणतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे...

आपल्याकडे आपणच आपल्या मराठी लोकांबद्दल म्हणतो की, कोणी मराठी माणूस पुढे जायला लागला की, आपलाच मराठी माणूस त्याला मागे खेचतो... पण हा समज आपल्या मराठी माणसांनीच खोटा ठरवलाय... कारण; अहो इथे तर सगळे मराठीच आहेत... त्यांच्या आख्या टीमने कौशलला सुरेख साथ दिली आणि हे म-हाटमोळं अभिमान गीत तयार झालं...

शिवाय यात केवळ मराठी गायकच नाहीत, तर अमराठी गायक - शंकर महादेव, हरीहरन, महालक्ष्मी अय्यर हे केवळ गाणे आणि गाण्याची संकल्पनाच ऐकून आपणहून तयार झाले...

हे गाणं भव्य दिव्य व्हावं यासाठी स्ट्रिंग सेक्शन थेट चेन्नईला ए. आर. रेहमानच्या स्टुडिओमध्ये केलंय...

कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीकडून स्पॉन्सरशीप न घेता, लोकांच्या सहयोगातून हे निर्माण केलं आहे...

एवढं सगळं असूनही, या मराठी गीताची मराठी मराठीचा उदघोष करणा-या नेत्यांकडून मात्रं उपेक्षाच होताना दिसत आहे...

मराठी बोललं पाहिजे, मराठी वागलं पाहिजे वगैरे भाषणं करणा-यांनी आता भलत्याच भाषेतल्या गाण्याचं कौतुक चालवलंय....

कौतुक करा... ते संगीतकार, गायक, ती भाषा महानच आहेत... करायलाच हवं कौतुक... पण किती?

जरा आपल्याकडे पहा... कितीतरी नवीन चांगले संगीतकार आहेत. कौशलसारख्या संगीतकाराने किती सुंदर मराठी अभिमान गीत तयार केलंय...

आपणच आपल्या मराठीचा योग्य तो प्रसार - प्रचार करायचा नाही आणि नंतर मराठीला, मराठी माणसाला बाहेर कोणी किंमत देत नाही म्हणून बोंबलायचं....

अर्थात अशा नेत्यांवर अवलंबून राहणं वेडेपणा आहे... या प्रसाराची प्रचाराची सुरुवात आपणच करायला हवी...

करायला हवी नव्हे... आता करूयाच...

मराठी अभिमान गीत व्ही.डी.ओ. पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :

http://www.youtube.com/watch?v=7PktyRvXlMs

2 comments:

  1. नुसतेच ऐकण्यापेक्षा आपले नाव पण नोंदवा -
    http://marathi.ipooja.com

    ReplyDelete
  2. CONGRATULATION FOR YOUR AWARD IN AIR PURIFICATION I WOULD LIKE TO CONTACT YOU IF POSSIBLE PLZ GIVE YOUR BUSINESS CONTACT DETAIL

    ReplyDelete